पार्श्वभूमी

मुलांना वैयक्तिक सुरक्षेबद्दल शिकविण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे त्यांचे पालक, शिक्षक व संगोपक. बाल लैंगिक शोषणाची संकल्पना समजावून सांगण्यासाठी व मुलांच्या सुरक्षेत त्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे याकरिता सोप्या टिपा सुचविण्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. ही पुस्तिका पालकत्वाच्या कौशल्यांवर विशेष भर देऊन पालक, शिक्षक, संगोपक व मुलांमधील वैयक्तिक सुरक्षा तसेच वैयक्तिक मर्यादा आखण्याविषयीचा संवाद हा अधिक मोकळा व सकारात्मक करण्यासाठी पुढाकार घेते. तसेच मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूत्रांकडे लक्ष वेधून घेते. बाल लैंगिक शोषणाची लक्षणे ओळखण्यासाठी, पिडीत मुलांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी तसेच मुलांसाठी आरामदायी व आश्वासक वातावरण निर्माण करून त्यांच्यात मदत मागण्याची वृती विकसित करण्यासाठी पालक किंवा संगोपकांना सक्षम करणे हे या हस्तपुस्तिकेचे मुख्य ध्येय आहे.